मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून रणनिती आखण्यात येत आहे. शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमादारांनाही मुंबईला बोलवण्यात आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १८ जूनपासूनच आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून काळजी घेण्यात येत आहे.
शिवसेनेचे आमदार पवईतील रेडियन्स हॉटेलमध्ये हजर राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवार देण्यात आले आहेत. सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार शिवसेनेकडून निश्चित जिंकून येतील.
हे पण वाचा :
दुर्दैवी ! किराणा आणण्यासाठी गेले अन् घरीच परतले नाही, नदी बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू
भारतात कोरोनाचा भयावह वेग, २४ तासांत १२ हजारांहून अधिक रुग्ण
पॅरा मिलिटरी फोर्समध्ये 75 हजार पदे रिक्त, जाणून घ्या कुठे नोकऱ्या मिळण्याची शक्यता
भाजपकडून आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न
आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला आमदारांच्या मतांची गरज लागणार आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी ५ उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये ४ उमेदवारांचा विजय निश्चित आहे. परंतु पाचव्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मतांची गरज लागणार आहे. या अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपकडून आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रणनिती आखून राज्यसभा निवडणुकीमध्ये १० अपक्ष आमदारांना भाजपच्या बाजूने केले होते. यामुळे भाजपचा विजय तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे.