स्मृतीशेष वामनदादा करंडक यांच्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये आपल्या सुरांच्या झंझावाताने स्पुलिंग कोणी पेटवलं असेल, तर ते आंबेडकरी समाजातील प्रसिद्ध गायक प्रतापसिंगदादा बोदडे यांनी पेटवलं आहे. “प्रतापसिंग बोदडे म्हणजे सुरांचा धगधगता यज्ञ कुंड होते.”
त्याच यज्ञ कुंडामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याची ‘समिधा’ अर्पण केली. दादा आपल्या गाण्यातून पटाचाराची कहाणी सांगताना उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यातून अग्निच्या ठिणग्या बाहेर पडत, तर “दोनच राजे इथे जाहले कोकण पुण्य भूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर” हे गाणे ऐकून उपस्थितांचे वीरबाहू स्पुरण पावून त्यांच्यामध्ये रोमारोमात चैतन्य सळसळायचं.
असे आपल्या सुरांनी, गाण्यांनी चेतना निर्माण करणारे प्रतापसिंगदादा आज माझ्या ‘हुंकार वेदनेचा’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाची तयारी करीत असतानाच दादा गेल्याची बातमी समाज माध्यमांवर समजली आणि काही क्षण शरीरातील चेतनाच निघून गेली, कारण प्रतापसिंग दादांनी समाजाच्या बोथट होऊ पाहणाऱ्या संवेदनां आपल्या सुरांनी कायम ‘चेतवत’ ठेवल्या होत्या. त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो नाही; पण त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना पाहिलं आहे, ऐकलं आहे. त्यांची मुलगी रागिनी बोदडे ही माझ्याकडे पाच वर्षापूर्वी स्केटिंगचं प्रशिक्षण घेत असताना तिच्या माध्यमातून दादांच्या व्यक्तीमत्त्वाबाबत जाणून घेता आलं.
प्रतापसिंग दादांनी त्यांच्या सुरांना, त्याच्या गाण्यांना, त्यांच्या लेखणीला व्यावसायिक स्वरूप देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. कदाचित त्यांनी तसं केलं असतं तर मुंबईच्या शिंदे घराण्याऐवजी प्रतापसिंग बोदडे यांचं घराणं राहिलं असतं. दादांच्या कुटुंबातील प्रत्येक जण गाण्याची, सुरांची उपासना करत असतो.
आज पर्यंत समाजातील एकही लग्न लागलं नसेल, की त्या लग्नाच्या वरातीत दादांचं ‘भीमराज कि बेटी’ हे गाणं गायलं नसेल, वाजवलं नसेल. हे गाणं निर्मितीची कहाणी देखील रंजक आहे. दादा मुंबईत रेल्वे खात्यात नोकरीला होते एके दिवशी आपल्ं कर्तव्य पार पाडून घरी आले असता, त्यांची दहा वर्षाची मुलगी रागिनी ही त्यांच्याजवळ खेळत होती तिला ते प्रेमाने ‘बाली’ म्हणायचे बालीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून दादांना शब्द सुचले, उमर मे बाली भोली भाली शिल की झोली हूॅं भीमराज कि बेटी मै तो जयभीम वाली हूॅं. मग काय या गाण्याने सार्या जगाला अक्षरश: वेड लावलं.
1996 मध्ये अकोल्यातील हिंगणे बुद्रुक येथील भीम टेकडीवर भंते धम्मपाल यांच्या विहार बांधणीच्या मदतीसाठी भीम-बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, गायिका वैशाली शिंदे बरोबर त्यांचा सामना सुरू होता, रात्रीचे अडीच वाजले होते, मैफल चांगलीच रंगली होती, अचानक एकच धावपळ उडाली, प्रेक्षकांमध्ये धांदल माजली, प्रतापसिंग यांचे सूर थांबले, त्यांना गातागाता पक्षघाताचा झटका आला होता, शब्द बोबडे वळू लागले, एक हात निकामी झाला आणि बघता-बघता शरीराची एक बाजू निकामी झाली. मात्र भंते धम्मपाल, कलावंत आणि ग्रामस्थांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले, उपचार सुरू झाला, उपचारासाठी खर्च खूप येणार होता त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या खिशातील पै-पै जमा करून लोकवर्गणीतून दिवसभरात तीस हजार रुपये जमा केले. ग्रामस्थांनी जमा केलेला पैसा, डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न आणि प्रतापसिंग दादांची दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दादा अक्षरश: मृत्यू कोठडीतील अंधाराला भेदून वर आले. डॉक्टरांनी त्यांना कमीत कमी सहा महिन्याचा आराम करण्याच्या सूचना दिल्या; पण आराम करतील ते प्रतापसिंग बोदडे कसले, सातव्याच दिवशी त्यांनी पुन्हा गाणी गायला सुरुवात केली.
जगप्रसिद्ध कव्वाल अब्दुल रफ चाऊस हे देखील त्यांच्या गाण्यांचे चहाते होते. नाशिकच्या पांडव लेण्या जवळच्या दर्ग्यात जगप्रसिद्ध कव्वाल अब्दुल रफ चाऊस, राणी रूपलता आणि प्रताप सिंग दादा यांच्यात तिरंगी सामना रंगला होता. प्रतापसिंग दादांची तळप, धडक, करारी मुद्रा, शब्दांची फेक आणि अत्यंत शीघ्रपणे शब्दांची जुळवणी, त्यांची लकब बघून चाऊस प्रचंड खुश झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर चाऊस दादांना जवळ घेऊन म्हणाले, आज तक प्रतापभाई को मै देखता था, मगर सुना नही था आज आपका गाना सुनकर मै खुश हु प्रतापसिंगभाई आज का चमकता सितारा है, और कल का रोशन चाॅंंद बनेगा.
कव्वाल चाऊस साहेबांचे शब्द खरे ठरले गेली सहा दशकं सुरांच्या क्षितिजावर प्रतापसिंग दादांचा आवाज सूर्य तेज्याप्रमाणे तळपत राहिला. आज ते फक्त आपल्यातून शरीराने निघून गेले परंतु त्यांचा आवाज, त्यांची गाणी त्यांचा सूर आंबेडकरी समाजाच्या हृदयसिंहासनावर कायमच विराजमान राहील.
अशा या सुरांच्या झंझावाताला विनम्र अभिवादन…
पोलीस नाईक, विनोद अहिरे
पोलीस मुख्यालय जळगाव ९८२३१३६३९९