नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघालेल्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर महागला आहे. तेल कंपन्यांनी आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ केली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमती 1000 रुपयांवर गेली आहे. त्यासोबतच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे.
देशभरात आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा वाढ करण्यात आली. यापूर्वी ७ मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज ३.५० रुपयांची दरवाढ झाली.
या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही महागला
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती