दरम्यान सर्वात सुखद असलेल्या रेल्वे प्रवासासाठी अनेक वेळा तुम्ही काही महिने आधीच तिकीट बुक करता. पण बऱ्याचदा तुमचा प्लॅन शेवटच्या क्षणी बदलतो आणि तुम्ही रेल्वे प्रवासासाठी महिन्याभरा पूर्वी काढलेले रेल्वेचे आरक्षित कन्फर्म तिकीट रद्द करण्याची वेळ तुमच्यावर येते. यात तुमचं आर्थिक नुकसान तर होतंच पण बदललेल्या प्लॅन नुसार प्रवासासाठी तिकीट सुद्धा मिळणं अवघड होतं, मात्र हे टेन्शन आता रेल्वे प्रशासनाने दूर केलं असून तिकीट रद्द करण्याची गरज नाही.
तुम्ही रेल्वेचे काढलेले जुने तिकीट रद्द करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला नवीन तिकीट मिळत नसेल तर थोडा वेळ थांबा. कारण, प्रवासाच्या तारखेत बदल झाल्यास तुम्हाला तिकीट रद्द करण्याची गरज नाही आणि तुम्ही त्याच ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. यासाठी तुमचे रेल्वेचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, तुम्ही तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख पुढे किंवा मागे करू शकता. तुमच्या प्रवासाची तारीख बदलण्यासाठी, तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या किमान २४तास अगोदर बोर्डिंग स्टेशनच्या स्टेशन मॅनेजर किंवा संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट देऊन अर्ज करावा लागेल. रेल्वेद्वारे प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहे.
प्रवासातील अंतर,स्टेशन बदलू शकता…
तुम्ही प्रवासाच्या गंतव्य स्थानकातही म्हणजेच अंतर स्टेशनात बदल करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचे अंतर स्टेशन बदलून तुमचा प्रवास पुढे चालू ठेवू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या TTE कडून तुमच्या स्टेशनला जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागेल. तुमच्याकडे तिकीट असेल तिथून पुढे जाण्यासाठी, तुम्हाला तेथून स्टेशनपर्यंत तिकीट काढावे लागेल.