मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत केलेल्या आदेशानंतर व वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर आता राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
बाळा नांदगावकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंना धमकी देण्यात आली असून तशा प्रकारचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या धमकीच्या पत्राची राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी नांदगावकरांनी केली.
दरम्यान राज ठाकरे यांना धमकीचे पत्र मिळाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली. या धमकीच्या पत्रानंतर राज ठाकरे याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.
राज ठाकरे यांना ज्या पत्राद्वारे धमकी देण्यात आलेली आहे त्या पत्राबाबत सांगताना नांदगावकर म्हणाले की, “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असे पत्रात लिहिले असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असेही त्यांनी सांगितले.