भ्रष्टाचार आणि मनरेगा योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करत असताना ईडीच्या कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटांचा खच सापडल्याने चांगलीच खळबळ उडाली.झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या जवळच्या दोन सहायकांकडून ईडीने जवळपास १९ कोटी रुपये जप्त केले आहे. मनरेगा योजनेतील गैरव्यवहाराची व इतर प्रकरणातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करत असताना ईडीने ही मोठी कारवाई केल्याचे समजते.
ईडीने एकूण १९.३१ कोटी रुपये काल दि.६ शुक्रवारी रोजी जप्त केले. यातील १७ कोटी रुपये पूजा सिंघल यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त करण्यात आले. तसेच १.८ कोटी रुपये हे दुसऱ्या ठिकाणावरुन जप्त केले. आयएएस अधिकाऱ्याच्या निवासस्थानातून कागदपत्रेही जप्त करण्यात आले असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान झारखंडच्या कुंतीचे विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याला ताब्यात घेतले आहे.राम सिन्हा यांनी मनरेगाच्या २००७-०८ मधील निधीत १८ कोटींचा गैरव्यवहार केला. त्यानंतर ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिन्हा याच्या चौकशी दरम्यान मनरेगाच्या निधीतील गैरव्यवहारात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघडकीस आली. त्यापैकीच आयएएस पूजा सिंगल या एक आहेत.
शुक्रवारी ईडीने झारखंड आणि इतर चार राज्यांमध्ये भ्रष्टाचार आणि मनरेगातील गैरव्यवहारबाबत चौकशी मोहिम सुरु केली. झारखंडमधील कारवाईत २०००, ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त करण्यात आले आहे. यापूर्वीच ईडीने राम बिनोदप्रसाद सिन्हा यांना अटक केली आहे.