जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर जळगावात मनसैनिकांकडून आज सकाळी ६ वाजेनंतर शनी मंदिरात आरती करत हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतली होती. मनसैनिकांनी पोलीस प्रशासनाने आपण दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने ३ मेपर्यंत अल्टीमेटम दिला होता. जर भोंगे उतरले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ४ मे रोजी राज्यातील अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. मनसेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि धरपकड सुरू केली होती.
दरम्यान, जळगावात पोलीस प्रशासनाने काल रात्रीच मनसैनिकांना नोटीस बजावल्या होत्या शहरात तीन ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज शहरातील शनीपेठ परिसरात मंगळवार ३ मे सायंकाळी मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मशिदीसमोर शनी मंदिरावर भोंग्यावर हनुमान चालीसा लावल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी संबंधित मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.