पुणे : नुकताच एप्रिल महिना संपत आला असून वाढत्या तापमानाच्या उकाड्यात नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेने यावर्षी एप्रिल महिन्यात रेकॉर्ड तोडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, शनिवार-रविवारी या दोन दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 2 मेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश राहील आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासूनच उन्हाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात तर मे हिटचा तडाखा जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६ अंशावर गेला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तापमानाने रेकॉर्ड तोडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार बहुतांश शहरांमध्ये समाधानकारक ते मध्यम श्रेणीत उष्मा नोंदवला जात आहे. जाणून घेऊया शनिवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल?
जळगाव : जळगावमध्ये काल तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला होता. त्यानंतर आज पुन्हा पारा ४५ अंशावर असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्र उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
मुंबई : शनिवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाशात हलके ढग असतील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 110 वर नोंदवला गेला.
पुणे : पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 120 वर नोंदवला गेला.
नागपूर : नागपुरात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 93 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक : नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘समाधानकारक’ श्रेणीत 68 आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 106 आहे.