जालना : राज्यात महिला सुरक्षित नाही, हे अनेक घटनांवरून वारंवार समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार जालन्यातही समोर आला आहे. इथं क्लिनिकमध्ये छापा टाकताच असं काही दृष्य दिसलं की संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.इथे जन्माच्या आधीच निष्पाप कळ्यांना मारण्याचा प्रकार सुरू होता. जालना इथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या टीमने एका अवैध गर्भपात केंद्रावर छापा टाकला. यामुळे इथं सुरू असलेला भयंकर प्रकार उघडकीस आला.
डॉ. सतीष गवारे यांच्या राजुरेश्वर क्लिनिक ढवळेश्वर या भोकरदन रोड जालना इथे बेकायदेशीर लिंगनिदान आणि अवैध गर्भपात करणारे नोंदणीकृत नसलेले अल्ट्रासाउंड मशीन असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर टीमने राजुरेश्वर क्लिनिक इथे छापा टाकला असता धक्कादायक प्रकार पाहून टीमही हादरली.
राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गरोदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात येत होता. यावेळी महिलेस भयंकर वेदना होत होत्या. क्लिनिकमधील परिस्थिती पाहून टीमने तत्काळ त्या महिलेस जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. यानंतर काही वेळाने गर्भपात करण्याच्या गोळ्या महिलेल्या दिल्याचं स्पष्ट झालं. हे संपूर्ण प्रकरण स्त्री भ्रूण हत्येचं होतं. टीमच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचे प्राण वाचले. दरम्यान, या धडक कारवाईत डॉ. सतीष गवारे सोनोग्राफी मशीनसहीत फरार झाला.
या अवैध गर्भपात केंद्राची झडती घेतली असता त्यांनी लपवून ठेवलेल्या गर्भपाताचे तीन MTP किट आणि एक वापरण्यात आलेले MTP किट आढळून आले. इतकंच नाहीतर जप्त केलेल्या वस्तूंमध्ये बऱ्याच डॉक्टरांचे रेफर बुक, रजिस्टर, MTP किट, नगदी रुपये, रुग्णाला लावण्यात आलेली सलाईन इत्यादी साहित्य सापडले. वैद्यकिय गर्भपात कायद्यानुसार पोलीस ठाणे चंदनझिरा इथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.