मथुरा : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कदायक घटना मथुरेमधील नौझील परिसरात घडलीय. वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वधू खोलीत बसली असताना ही घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
नोएडाहून आली होती वरात
मिळालेल्या माहितीनुसार, मुबारकपूर गावातील रहिवासी खुबीराम यांची मुलगी काजल हिचे लग्न नोएडा येथील तरुणासोबत ठरलं होतं. मुबारिकपूरमध्ये गुरुवारी रात्री नोएडाहून खुबीराम प्रजापती यांच्याकडे वरात आली. लग्नात स्वागत मिरवणुकीनंतर वरमाळाचा सोहळा पार पडला. काजलने तिच्या वराला वरमाळा घातली. हसत-हसत वरमाळा घालण्याचा कार्यक्रम झाला. काजलच्या मैत्रिणींनी काजलला वरमाळाच्या जागेवरून एका खोलीत नेलं.
याच ठिकाणी काजलवर गोळ्या झाडल्या. लग्नातील कामं सर्वजण आनंदानं करत होते. कोणी नाचत होते, कोणी जेवत होते. दरम्यान, गोळीबाराच्या आवाजानं लग्ना समारंभाच्या आनंदावर विरजण पडलं. वधूच्या मृत्यूने विवाह सोहळ्यात खळबळ उडाली. दरम्यान आरोपी पळून गेला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. एसपी देहत श्रीचंद यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. एकतर्फी प्रेमप्रकरण दिसते.
वधूची हत्या करण्यापूर्वी आरोपी तरुणाने त्याच्या साथीदारांसह वऱ्हाडींना खूप धमक्या दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आरोपींनी वरमाळाचा कार्यक्रमा दरम्यान दगडफेकही केली. आरोपी तरुण हा गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असल्याचं एसपी देहाट यांनी सांगितले.