मुंबई : विरोधकांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्या अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेच काम विरोधकांना उरलं आहे. भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्यांचे ते प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सुनावलं आहे.
एकनाथ खडसे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा दावा केला. विरोधकांनी केंद्र सरकारकडे महागाईला दिलासा कसा मिळेल यासाठी मागणी करावी. महागाईने राज्यात उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारची भूमिका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विषयी कठोर आहे. शासनाचे काम गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठीचं आहे. अशा स्वरूपाची कृती शासनाकडून अपेक्षित असते. महाविकासआघाडी सरकार या दृष्टीने आता पाऊल उचलत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असं खडसे यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन करावं, असा भाजपने निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यांच्या याच गौप्यस्फोटावर देखील एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपलाच शिवसेनेसोबत युती नको होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला युती तोडण्यास भाग पाडलं, असा मोठा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
“निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यांचा काही महत्त्वाचा रोल नव्हता. आशिष शेलार आता जे वक्तव्य करत आहेत, पण त्यावेळी ते निर्णय प्रक्रियेत नव्हते. त्यामुळे त्यांना पुरेशी माहिती नाही. खरी माहिती ही वेगळीच आहे. शिवसेनाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं असतं, पहिल्यांदा द्या किंवा नंतर द्या, तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण तुम्हालाच मुख्यमंत्रीपद पाच वर्ष हवं होतं. त्यामुळेच तुम्ही शिवसेनेला युती तोडण्यासाठी भाग पाडलं, असं एकदंरीत मागचा इतिहास आहे. त्यावेळेस मी निर्णय प्रक्रियेत होतो. त्यामुळे त्या कालखंडात काय झालं हे त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे”, असा टोला एकनाथ खडसे यांनी आशिष शेलारांना लगावला.