पिंपरी चिंचवड : साधारण आठवडाभरापूर्वीच पुण्यातील बावधन परिसरात एका रिक्षाचालकाने 2 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीसमोर एका रिक्षाचालकाने हस्तमैथून केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय.
सचिन शेंडगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 12 वर्षीय मुलगी क्लासवरुन घरी जात असताना रिक्षाचालक विरुद्ध दिशेनं आला. पत्ता विचारण्याचा बहाणा करुन आरोपीने मुलीसमोर हस्तमैथून केलं. या घटनेमुळं मुलगी घाबरली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हिंजवडी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आरोपी रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
यापूर्वी एप्रिल 2021 मध्येही पिंपरी चिंचवडच्या मोरेवाडी परिसरात रिक्षातून जाताना सहप्रवासी महिलेकडे पाहून एका तरुणानं हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आला होता. पीडित महिलेनं पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. पिंपरीतील मोरवाडी येथून रिक्षातून वायसीएम रुग्णालयात पीडित महिला आपल्या मुलाला उपचारासाठी घेऊन जात होती. त्यावेळी तिच्याकडे बघत संबंधित तरुण हस्तमैथुन करत होता. हा घृणास्पद प्रकार समजल्यानंतर महिलेनं थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली होती.