मुंबई : लवकरच राज्यातील चेकपोस्ट बाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. परिवहन विभागातील भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गृहविभागाकडून राज्यातील चेकपोस्ट बंद करण्यासंदर्भात ‘अभ्यास गटाची’ स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, अभ्यास गटाद्वारे चेकनाके बंद करण्याच्या कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत अभ्यास करेल. त्याचप्रमाणे जर चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय झाला, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रकारे करायची, याचाही अहवाल सादर करावा लागणार आहे.
पुढील 3 महिन्यात राज्यातील सर्व चेकपोस्ट (Check Post) बंद होण्याची शक्यता आहे. तसे आदेश परिवहन विभागाला देण्यात आल्याचे समजतेय. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशानंतर सीमा तपासणी नाके, म्हणजेच चेक पोस्ट बंद करण्याबाबत अभ्यासगट तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा अभ्यासगट चेक पोस्ट बंद केले तर त्याचे परिणाम काय होती आणि त्यावरच्या उपाययोजनांच्या बाबतीच अभ्यास करुन एक अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर चेंक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
चेकपोस्ट बंद केल्यास त्याचा राज्य सरकारवर किती आर्थिक भार पडेल, याबाबतचे परिणाम आणि उपाययोजना काय असतील, हे देखील अहवालातून स्पष्ट करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करुन चेक पोस्ट बंद करण्याबाबतचा निर्णय जारी केला जाण्याची शक्यता आहे.
अभ्यास गटामध्ये कुणाकुणाचा समावेश?
गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर अभ्यास गटात परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार केला जाणार आहे. तर इतर पाच सदस्यही या अभ्यास गटाचा भाग असतील. त्यांच्यात परिवहन उपायुक्त दिनकर मनवर, लेखा उपायुक्त तुळशीदास सोळंकी, परिवहन उपायुक्त राजेंद्र मदने आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांचाही समावेश असणार आहे.