जळगाव, (प्रतिनिधी)-आयबीपीएसच्या वतीने घेण्यात आलेल्या बँक प्रोबेशनरी पदाच्या परीक्षेत दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल या निवासी प्रकल्पातील शिल्पा दानिश महाजन आणि शिवराम तोटेवाड या दोन विदयार्थ्यानी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे यातील शिल्पा हि विदयार्थीनी प्रज्ञाचक्षु आहे.शिल्पा गेल्या दोन वर्षांपासून तर शिवराम एक वर्षांपासून दीपस्तंभच्या मनोबल निवासी प्रकल्पाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत होते. शिल्पा पठाणकोटची रहिवासी असून तिची नेमणूक पंजाब नॅशनल बँकेत झाली आहे.शिवराम नांदेड जिल्ह्यातील दिवशी या गावातील रहिवासी असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे.वडील शेतकरी असून घरी एक एकर कोरडवाहू शेती आहे, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शिवरामची नेमणूक महाराष्ट्र बँकेत झाली आहे.
पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना अचानकच माझ्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली.मला ह्या परीक्षेबद्दलची प्राथमिक माहिती सुद्धा माहिती नहोती .२०२० ला मी मनोबलच्या संपर्कात आली आणि मला स्पर्धा परीक्षांची माहिती झाली.मनोबल मुळे माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली, आणि मी ही स्पर्धा परीक्षा देऊ शकते हा विश्वास माझ्यात निर्माण झाला.माझ्या यशात दीपस्तंभचे मोठे योगदान आहे अश्या भावना शिल्पाने व्यक्त केल्या.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आधार देऊन मनोबलने मला स्पर्धा प्रशिक्षणाची संधी दिली आणि त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो अश्या भावना शिवरामने व्यक्त केल्या.
दिव्यांग विदयार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. यशस्वी होण्यासाठी दृष्टी नव्हे तर दृष्टिकोन महत्वाचा असतो.शिल्पाचे हे यश अनेक प्रज्ञाचक्षु विदयार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.मनोबल साठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे अश्या भावना यजुर्वेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या.