जळगाव : जळगाव जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जळगाव दौर्यावर होते. त्यांच्या उपस्थिती मध्ये रावेर येथे कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरीही उपस्थित होते.
यादरम्यान, काँग्रेस आमदाराच्या समोरच काँग्रेसच्या माजी नगरसेवक आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
आपल्याच पक्षातील माजी नगरसेवक-कार्यकर्त्यांनी सोडचिठ्ठी दिल्याचं पाहून काँग्रेस आमदार शिरीष चौधरी स्टेजवरुनच गायब झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराच्या समोरच राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.