भुसावळ | भुसावळ येथे गुटखा जप्तीची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तीन कंटेनरमध्ये भरलेला आणि तब्बल २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलीय. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
याबाबत असे की, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी सहकार्यांचे एक पथक तयार केले. भुसावळ-साकेगाव दरम्यान पाहणी करीत असताना या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असलेले दिसले.
या वेळी पोलिस ताफा कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.
दरम्यान, तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करून जमा केले आहेत. या गुटखा नेमका कुणाचा याचा शोध सुरु आहे. भुसावळ पोलिसांनी अलीकडच्या काळात गुन्हेगारांवर वचक बसावा म्हणून त्यांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यातच मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.