मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अखेर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरित्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. ’याआधी कधीच कोणाला जेवढा प्रतिसाद मिळेल नसेल तेवढा प्रतिसाद महायुतीला मिळेल’, असा विश्वास व्यक्त करताना, ’बंडखोरांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांना जागा दाखवू. त्यांना युतीत स्थान नसेल’, असा सज्जड दमही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
’राज्यात काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत सगळ्या बंडखोरांना माघार घ्यायला लावणार आहोत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ऐकतील व बंडखोरी राहणार नाही, असे आम्हाला वाटते. त्याउपरही बंडखोरी राहिल्यास ती करणार्यांना युतीत स्थान नसेल. त्यांना त्यांची जागा महायुती दाखवेल’, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.
’महाराष्ट्राच्या मनातली महायुती मैदानात उतरली आहे. कुणी अतिशयोक्ती म्हणेल, पण महाराष्ट्रात कधीच कुणाला प्रतिसाद मिळाला नाही इतका प्रतिसाद या निवडणुकीत महायुतीला मिळेल. हिंदुत्वाचा धागा भाजप आणि शिवसेनेला जोडणारा आहे. त्यामुळे महायुती व्हावी अशी तमाम जनतेची अपेक्षा होती आणि त्यानुसारच आमची युती झाली आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर केली. त्यावेळी ते बोलत होते. ’महायुतीत सगळ्यांनाच काही प्रमाणात तडजोड करावी लागली आहे. युतीसाठी ते करावेच लागते’, अशी पुस्तीही मुख्यमंत्र्यांनी जोडली.
’त्यांची जबाबदारी बदलली आहे’
एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी डावलण्यात आल्याबद्दल विचारले असता, ’याला तिकीट कापले असे म्हणता येणार नाही. पक्षात जबाबदार्या बदलत असतात. त्यांची जबाबदारी आता बदलली आहे. त्यांच्या जागी दुसर्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
’तुम्हाला इतकी घाई का?’- ’आदित्य ठाकरे हे लवकरच आमच्यासोबत विधानसभेत दिसणार आहेत. त्यांचे मी स्वागत करत आहे’, असे नमूद करताना ’आदित्य हे मुंबईतून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील’, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आदित्य यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न असल्याबद्दल विचारले असता, ’त्याची तुम्हाला इतकी घाई का?’, असा उलट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
’आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं- आदित्य यांना मुख्यमंत्री बनवण्याची शिवसैनिकांची इच्छा, युतीत शिवसेनेला मिळालेल्या निम्म्यापेक्षा कमी जागा याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता, ’तुझं-माझं करत राहण्यापेक्षा आम्ही महाराष्ट्राचा विचार करून युती केली आहे’, असे सांगत त्यांनी सारवासारव केली. ’आकड्यांवर सर्व काही अवलंबून नसतं. मनापासून युती झाल्यानंतर पुढच्या गोष्टी आपापसात बसून ठरवता येतात. दोन्ही पक्ष समजूतदार आहेत. त्यामुळे लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण याचा विचार करत बसण्यापेक्षा दोन्ही भाऊ एकत्र पुढे चालले आहेत. आमच्यात ज्या गोष्टी ठरल्यात त्या मी येथे उगाळत बसणार नाही’, असे उद्धव म्हणाले.
’आदित्यचे सक्रिय राजकारणातील हे पहिले पाऊल आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे त्याचे स्वप्न आहे, इतकेच मी येथे सांगेन’, असेही उद्धव यांनी पुढे नमूद केले. कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर बोट ठेवून कणकवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने उभी ठाकली आहे, असे विचारले असता, ’तिथे आम्ही आमनेसामने असलो तरी येथे बाजूबाजूला बसलो आहेत. त्यामुळे त्याची चिंता नसावी. त्यावर आम्ही तोडगा काढू’, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.
युतीचा फॉर्म्युला- महायुतीत शिवसेनेला 124 जागा
– त्याशिवाय भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेच्या दोन जागा
– अन्य घटकपक्षांना 14 जागा
– उरलेल्या 150 जागी भाजपची लढत