कोल्हापूर – ’युतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगितले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी दिसत नाही. केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक आहे. सर्वधर्मियांचा सन्मान राखण्यासह सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी राज्यातील निवडणूक महत्त्वाची आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केलं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या शरद पवार यांनी आज सकाळी पंचशील हॉटेलात आघाडीच्या उमेदवारांशी संवाद साधला. प्रचारात कोणते मुद्दे असावेत याबाबत त्यांनी उमेदवारांना सूचना केल्या. उमेदवारांना वैयक्तिक मार्गदर्शनही त्यांनी केले. ते म्हणाले, ’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीचे विचार मांडले. त्यांना राज्यातील गरिबी, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, आर्थिक मंदी दिसली नाही. त्यांनी केवळ हिंदुत्वाचा विचार मांडला. या देशात सर्वधर्मीय संस्कृती असताना केवळ हिंदुत्ववादाचा विचार मांडणे देशासाठी घातक आहे. विकासाचे मुद्दे नसल्याने त्यांना हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागत आहे. सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे घातक असल्याने सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्ती थोपवणे गरजेचे आहे. या दृष्टीने निवडणूक राज्यासह देशासाठीही महत्त्वाची आहे,’ असं ते म्हणाले.
आघाडीतील बंडखोरांचीही त्यांनी कानघडणी केली. ते म्हणाले, ’चुकीच्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. एकजुटीने लढण्याची ही वेळ आहे. अशावेळी नाराजी सोडून सर्वांनी एकत्र यावे. कोल्हापूर हा प्रगतशील विचारांचा जिल्हा आहे. शाहू महाराजांच्या विचारांची परंपरा लाभलेल्या कोल्हापुरात तत्वनिष्ठ राजकारण होते. कोल्हापुरातील विचार आम्ही जगभर मांडतो. गेल्या निवडणुकीत मात्र, शाहू-फुले यांच्या विचारांपासून जिल्ह्याने फारकत घेतली. कोल्हापुरात सेना-भाजप वाढणे हे शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत नाही. यामुळे काहीही झाले तरी विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झालेच पाहिजे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास हे अशक्य नाही.’ माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे यांच्यासह व्ही. बी. पाटील व आघाडीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी 8 कोटी 95 लाख 62 हजार 706 मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 95,473 मतदान केंद्रं असून 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.