नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली अयोध्या प्रकरणाची सुनावणी आता 18 ऐवजी 17 ऑक्टोबरलाच पूर्ण होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, या दिवशीच घटनापीठ आपला निकाल राखून ठेवेल. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयास आता विजयादशमीच्या सुट्या असून या प्रकरणी पुढील सुनावणी 14 ऑक्टोबरला होईल. तत्पूर्वी सरन्यायाधीशांनी शनिवारी सुटीच्या दिवशी सुनावणी करण्यास नकार दिला होता.
शुक्रवारी सुनावणीच्या 37 व्या दिवशी मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी आपण दिवसभर युक्तिवाद मांडू, असे सांगितले. शनिवारी ही सुनावणी सुरू राहिली तर आणखी एक तास युक्तिवादासाठी लागेल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सरन्यायाधीशांनी शनिवारी सुनावणी होणार नाही, असे स्पष्ट केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 रोजी निवृत्त होत आहेत. घटनापीठ त्याच दिवशी निकाल देऊ शकते.
सुनावणीच्या शेवटच्या चार दिवसांचे वेळापत्रक-14 ऑक्टोबरला मुस्लिम पक्ष युक्तिवाद पूर्ण करेल. त्यानंतर यावर युक्तिवाद करण्यासाठी हिंदू पक्षाला दोन दिवस मिळतील. 17 ऑक्टोबर हा सुनावणीचा शेवटचा दिवस असेल. या दिवशी सर्व पक्ष आपले युक्तिवाद पूर्ण करतील.