बोदवड- बोदवड शहरातील जेडीसीसी बँकेतील तत्कालीन वीज बिल वसुली कारकूनाच्या खात्यातील दोन लाख 70 हजार 800 रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कार्यकारी संचालक, संचालक तसेच कारकून, कॅशियर व प्रशासन व्यवस्थापकाविरुद्ध बोदवड पोलिसात फसवणूक व अॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
बोदवड जेडीसीसी बँकेचे निलंबीत कर्मचारी व तक्रारदार रमेश यादव तेलंग (रेणुका नगर, बोदवड) हे 2008 पासून जेडीसीसी बँकेत वीज बिल वसुली कारकून पदावर कार्यरत असताना बँक संचालक दशरथ पाटील यांनी 7 जुलै 2017 रोजी शंभर रुपये उसने मागितल्यानंतर तेलंग यांनी विड्रॉल स्लीप दिली मात्र ही स्लीप सेव्हिंग खात्यात टाकण्याऐवजी ईसीसी कॅश-के्रडीट कर्ज खात्यात टाकून दोन लाख 70 हजार 800 रुपयांची रक्कम काढण्यात आली. 7 जुलै 2017 ते आजपावेतो जळगाव जेडीसीसी बँकेच्या बोदवड शाखेत हा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपहारासाठी कारकून व कॅशिया यांनी स्लीपवर खाडाखोड केल्याचा आरोप आहे तसेच कार्यकारी संचालक व प्रशासन व्यवस्थापक यांनी खोट्या आरोपाची शहानिशा न करता निलंबीत केल्याने तसेच बँक संचालक यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आल्याने पाचही संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये जेडीसीसी बँक संचालक दशरथ गोविंदा पाटील, कारकून अशोक भोपलू इंगळे, कॅशियर तुळशिराम भगवान पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख तसेच प्रशासन व्यवस्थापक भरत रामदास पाटील यांचा समावेश आहे.