मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पुण्यात विविध कार्यक्रमांचे उद्घघाटन करण्यात आले. तर याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही पिंपरी-चिंचवडमध्ये काही विकास कामांचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत इशाराही दिला.
काय म्हणाले नितेश राणे?
या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं, यानंतर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चप्पल फेकल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, २४ तास पोलिसांना सुट्टी द्या मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो असे म्हणत त्यांनी मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवले.