पुणे : एकीकडे तापमानाचा पारा वाढू लागला असताना त्यात बदलत्या हवामानामुळे उद्यापासून राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या 07 मार्च रोजी हवामान खात्याने नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेघगर्जना होणार आहेत. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. याशिवाय उद्या पुण्यासह ठाणे, पालघर, अहमदनगर आणि जालना या पाच जिल्ह्यात देखील ढगाळ हवामानाची शक्यता आहे. येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
08 आणि 09 मार्च रोजी राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. या दिवशी जवळपास सर्वच राज्यात पावसाची स्थिती राहणार आहे. मंगळवारी (8 मार्च) राज्यात पश्चिम महाराष्ट्रसह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी सर्वच ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित ठिकाणी वेगवान वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. कोकणातही ढगाळ हवामान राहणार असून येथेही पावसाची स्थिती आहे.