पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यात मेट्रोच्या उदघाटनापासून ते अनेक कार्यक्रमांचा धडाका लावला. मात्र, या दौऱ्यात व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुजगोष्टी रंगल्या आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते सरकार पाडण्याच्या तारखा देत आहे. त्यातच आता फडणवीस आणि अजितदादा यांच्यात चर्चा रंगल्यामुळे नेमकं काय म्हणाले असतील, अशी राजकीय चर्चा रंगली आहे.
जुन्या आठवणींना उजाळा
व्यासपीठावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप नेते गिरीश बापट आदी मान्यवर उपस्थित होते. मोहोळ आणि बापट तर फडणवीस आणि अजित दादांच्या अगदी जवळ उभे होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये अशा काही चर्चा रंगल्या की, विचारूच नका. खरे तर अजित दादांनी केलेले बंड शरद पवारांनी हाणून पाडले आणि अगदी भल्या पहाटे त्यांनी घेतलेली शपथ आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे सारे विरून गेले. त्यावेळी त्यांना अजित दादांनी भक्कपणे साथ दिली, पण ती निभावता आली नाही. आजच्या त्यांच्यातल्या गप्पा पाहून त्या आठवणींना आपसुकच उजाळा मिळाला. काहीही असो. महाराष्ट्राचे राजकारण इतरांपेक्षा वेगळे आणि एक पाऊल पुढे आहे. कोणी त्याला सुसंस्कृतपणा म्हणो की, कोणी आणखी काही. या गोडव्याची चर्चा होणारच.
दरम्यान, अजितदादांनी आपल्या भाषणात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘मला पंतप्रधानांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायचं आहे काही महत्वाच्या पदावर असलेले लोक महामानवाच्या संबंधी काही वाक्य बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक सावित्री बाई यांच्याबाबत काही वक्तव्य झाली आहेत’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.