नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
युक्रेनमधील मुलांना सोडवून आणणं अधिक गरजेचं असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण ते अर्धवट कामाचे उद्घाटन करत आहेत. अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. याचा विचार पंतप्रधानांनी केला असावा’, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लगावला. दरम्यान, शरद पवारांच्या या टीकेला आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
‘युक्रेनमधील विद्यार्थ्यांकडं केंद्र सरकारनं अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. विद्यार्थ्यांना आणलं जात आहे. दररोज दोन-दोन, तीन-तीन फ्लाइट भारतात येत आहेत. आमचे चार कॅबिनेट मंत्री युद्ध भूमीच्या अगदी जवळ गेलेत. असं पहिल्यांदाच होतंय. मंत्री स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना भेटतायत, त्यांना दिलासा देतायत, विचारपूस करतायत. त्यांना मायदेशात आणण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना केंद्र सरकार काहीच करत नाही असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार साहेब करत आहेत,’ असं महाजन म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाजन नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. ‘पवारांच्या आरोपांना काही अर्थ नाही. जी कामं पूर्ण झाली आहेत त्याचीच उद्घाटनं होतायत. पवार साहेबांचा मेट्रोशी काडीमात्र संबंध नसताना ते मेट्रोमध्ये फिरून का आले? मी किती चांगलं काम करतोय हे दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप महाजन यांनी केला. ‘पंतप्रधान येतायत त्यामुळं सगळं पुणं भाजपमय, मोदीमय झालंय. त्यामुळं त्यांना वाईट वाटलंय. त्यातूनच पवार साहेब असले आरोप करत आहेत, असं महाजन म्हणाले.