मुंबई : आज मार्च २०२२ महिन्याचा पहिलाच दिवस आहे. आजपासून अनेक वस्तू महागणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार आहेत. आज सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ झाली आहे. 14 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय अमूल दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर ने फेब्रुवारीमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमतीत दोनदा वाढ केली आहे. वाढलेल्या किंमतीचा परिणाम या महिन्यात तुमच्या घरच्या बजेटवर दिसून येईल. नवीन उत्पादन महाग होईल.
किंमतीत 105 रुपयांनी वाढ झाल्यानंतर नवी दिल्लीत 19.2 किलो गॅस सिलिंडरचा नवीन दर 2,012 रुपये झाला आहे. नवीन किमती 1 मार्च 2022 पासून लागू झाल्या आहेत. 5 किलोच्या सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांनी वाढ झाली आहे. आता दिल्लीत 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 569 रुपये असेल.
गुजरातमधील डेअरी ब्रँड अमूलने आपल्या उत्पादनाच्या किमतीत रु.2 ने वाढ केली आहे. नवीन दर देशभर लागू होणार असून आजपासून ते लागू होणार आहेत. यापूर्वी जून 2021 मध्ये अमूलने किंमतीत 2 रुपयांनी वाढ केली होती. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी वाढ आहे.
फेब्रुवारी महिन्यात सर्वसामान्यांना महागाईचा जोरदार झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी FMGC कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने फेब्रुवारीमध्ये लाइफबॉय, लक्स आणि पिअर्स साबणांच्या व्यतिरिक्त सर्फ एक्सेल मॅटिक, कम्फर्ट फॅब्रिक कंडिशनर, डोव्ह बॉडी वॉश या ब्रँडच्या स्टॉक ठेवण्याच्या युनिट्सच्या किंमतीत आणखी वाढ केली आहे.