केंद्र सरकारने अत्यावश्यक खाद्य जिन्नसांची स्थानिक बाजारात उपलब्धता वाढवण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक प्रकारची सक्रिय आणि पुर्वानुमान आधारित पावले उचलली आहेत. सरकारच्या या उपाययोजनांमुळेच मूग डाळीच्या दरात मोठी घट झाली आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 28-2-2022 रोजी मूग डाळीचा अखिल भारतीय सरासरी किरकोळ दर 102.36 रुपये प्रति किलोवर आल्याची नोंद झाली. 28-2-2021 रोजी म्हणजे गेल्या वर्षी हा दर 106.47 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच मूग डाळीच्या दरात 3.86 % घट झाली.
डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मुगाच्या आयातीला ‘मुक्त श्रेणी’ अंतर्गत 15 मे, 2021 पासून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुलभतेने आणि विनासायास आयात होण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर तूर आणि उडीद यांची मुक्त श्रेणी 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. संबंधित विभाग/संघटना यांच्याकडून अतिशय बारकाईने होणारी देखरेख आणि अंमलबजावणी यांचे पाठबळ या धोरणाला मिळाले आहे. आयातीसंदर्भातील उपाययोजनांच्या धोरणामुळे तूर, उडीद आणि मूग यांच्या आयातीत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.