राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात बोलतांना समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असं वक्तव्य केलं होतं या वक्ताव्यावरून राज्यात टीका होतांना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या इंस्टाग्रामवर शरद पवारांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
काय म्हटलं आहे या व्हिडीओ मध्ये…
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी (pawarspeaks )स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या.
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली.
बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात, तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नसल्याचं मत काही इतिहासकार व्यक्त करतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जानेवारी 2020 मध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या काळात रामदास नव्हते’, असं वक्तव्य केलं होतं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं.