मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी सुरु झाली आहे. मलिकांच्या घरी ईडीचे अधिकारी पहाटेच धडकले. ईडीचे अधिकारी बुधवारी पहाटे सीआरपीएफच्या जवानांचा ताफा घेऊन नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कुर्ला येथील नूर मंजील या निवासस्थानी पोहोचले. त्यांनी मलिकांना आपल्या कार्यालयात नेत सकाळी पावणेआठच्या सुमारास चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे समजतेय. अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर मलिकांनी केलेल्या आरोपांनी राज्यातले राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.
मलिकांवर काय आहेत आरोप?
मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.
हे देखील वाचा :
‘गहरेयां’ रिलीज होताच दीपिका पदुकोण आणखीनच बोल्ड झाली, पहा बिकिनी फोटोशूट
स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? Flipkart वर या टीव्हीवर मिळतेय मोठी सूट
‘या’ महिन्यापासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार, पण ..राजेश टोपेंची माहिती
का चौकशी सुरू?
फडणवीसांनी असाही आरोप केला होता की, या जमिनीची विक्री सरदार शाह वली खान आणि सलीम पटेलने केली होती. नवाब मलिकही यांचेही काही काळ या कंपनीशी संबंध होते. कुर्ला येथील एलबीएस रोडवरील या 3 एकर जमिनीची किंमत साडेतीन कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, ती केवळ 20 ते 30 लाखांत विकली. याचे सर्व पुरावे आपण केंद्रीय संस्थांना दिले आहेत, असा दावाही केला होता. मलिकांची याबाबतच चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र, अजूनपर्यंत तरी ईडीकडून कसलिही माहिती देण्यात आली नाहीय.