एरंडोल, (प्रतिनिधी) – तालुक्यातील माळपिंप्री येथील सोन्या-चांदीचे व्यापारी रवंजे येथील दुकान बंद करून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराकडे येत असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन युवकांनी व्यापाऱ्याची मोटरसायकलला धडक देऊन त्याच्या पाठीवर व दंडावर चाकूने वार करून त्याच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

परिसरात खळबळ…
रस्त्यावर भर दुपारी व्यापाऱ्यांची लूट करण्यात आल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, माळ पिंप्री तालुका एरंडोल येथील राजेंद्र बबन विसपुते वय ५०, यांचे रवंजे येथे श्री समर्थ कृपा ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. राजेंद्र विसपुते हे दररोज सकाळी ९ वाजता माळपिंप्री येथून रवंजे येथे जात असतात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते ही नेहमी प्रमाणे पिंपळकोठा येथील लाठी पेट्रोल पंप जवळ असलेल्या कच्च्या रस्त्याने चोरटक्की मार्गे रवंजे येथे गेले.
दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले आणि आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी बी 9781 मी घराकडे यायला निघाले विखरण ते चोरटक्की दरम्यान असलेल्या टेकडीवर त्यांच्या पाठीमागून पाठलाग करत असलेल्या मोटरसायकल वरील तीन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करून मोटर सायकल आडवी लावून त्यांना अडवले त्यानंतर तीन पैकी एकाने त्यांच्यावर पिस्तोल रोखले व दुसऱ्याने त्यांच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार करून जखमी केले तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या जवळ असलेली नायलॉनची फिश पिशवी हिसकावली. पिशवी मध्ये असलेले सुमारे दीडशे ग्रॅम सोने, चार किलो चांदी व 52 हजार रुपये रोख व रेडमी कंपनीच्या मोबाईल असा सुमारे 8 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज व व्यापारी राजेंद्र विसपुते यांची मोटर सायकल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.