दिल्ली- भाजपाची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, सातार्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा नेते अरुण सिंह यांनी ही घोषणा केली.
भाजपाच्या या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे. 12 मतदारसंघांची आदलाबदल करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. पुण्यातील आठही जागा भाजपाच्या वाटेला तर मुंबईतील 19 जागा या शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. विदर्भ (38), उत्तर महाराष्ट्र (11), मुंबई-ठाणे (20), कोकण (2) , पश्चिम महाराष्ट्र (31) इतक्या जागांवरील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. दरम्यान, पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
उत्सुकता लागून राहिलेल्या काही महत्वाच्या मतदारसंघांपैकी कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे सातार्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.