भारतीयांसाठी एक खुशखबर म्हणावी लागेल अशी बातमी आहे,केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज 5G संदर्भात मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले की,“देशाने स्वतःचे स्वदेशी विकसित 4G कोर आणि रेडिओ नेटवर्क देखील विकसित केले आहे. 5G नेटवर्क देखील विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे. देश आज 6G मानकांच्या विकासामध्ये, 6G च्या विचार प्रक्रियेत सहभागी होत आहे. यावरून लक्षात येते की, भारतात लवकरच 5G नेटवर्क सुरु होईल.
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील भागधारकांना पात्र परदेशी खरेदीदारांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ‘इंडिया टेलिकॉम 2022’ चे उद्घाटन केले. एका विशेष आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात, प्रमुख मान्यवर दूसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, डीसीसीचे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे सचिव (टी) श्री के राजारामन यावेळी उपस्थित होते.
दूरसंचार उपकरणे आणि सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे (टीईपीसी) 8 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान भारत सरकारच्या वाणिज्य विभागाच्या विपणन प्रवेश पुढाकार योजने (एमएआय) अंतर्गत, परराष्ट्र मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या सहकार्याने आणि विविध देशांतील भारतीय मिशनद्वारे आयोजित केला जात आहे.
45 हून अधिक देशांतील पात्र खरेदीदार या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. परिषदेव्यतिरिक्त, 40 पेक्षा अधिक भारतीय दूरसंचार कंपन्या प्रदर्शनात त्यांची उत्पादने आणि क्षमता प्रदर्शित करत आहेत. आपल्या उद्घाटनपर भाषणात, दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हणून उदयास आला आहे. आज भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 75 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे. हे 20% सीएजीआर (संयोजित चक्रवाढ वार्षिक वृद्धी) पेक्षा जास्त वाढत आहे.”
“संवाद ही केवळ सुविधा नाही. हे देशातील नागरिकांना माहिती, शिक्षण आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळण्यास मदत करून सक्षम बनवते आणि आजच्या सरकारला उत्तरदायी बनवते”, असे दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान म्हणाले.
“संपूर्ण भारतीय बनावटीच्या, भारतीय 4G स्टॅकची चाचणी अंतिम टप्प्यात आहे आणि काही महिन्यांत ते सुरु होण्याची अपेक्षा आहे. तंत्रज्ञान उद्योग विकसित करण्यात 5G महत्वाची भूमिका बजावणार आहे, 5G रोजच्या जीवनात नवीनतम तंत्रज्ञानाचा मार्ग मोकळा करेल, त्यामुळे भारतीय तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये फिनटेक सोल्यूशन्सचा प्रसार होईल. जगासाठी 5G उपकरणे भारतात तयार केली जात आहेत” असे आपल्या भाषणात डीसीसीचे अध्यक्ष आणि दूरसंचार विभागाचे सचिव (टी) श्री के राजारामन म्हणाले.
इंडिया टेलीकॉम 2022 हे तंत्रज्ञान आणि व्यवसाय देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ आहे.