जळगाव, – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख पदी डॉ.सुधीर भटकर यांची कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील यांनी नियुक्ती केली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
विद्यापीठाने जनसंवाद आणि पत्रकारिता या विभागासाठी सन 2012 मध्ये जाहिरात देऊन मुलाखतीद्वारे डॉ.तुकाराम दौड यांची सहयोगी प्राध्यापक पदासाठी ते पात्र नसतांना तत्कालीन कुलगुरु डॉ.सुधीर उमाजी मेश्राम यांनी नियुक्ती केली होती. मुळात या पदाच्या पात्रतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार उमेदवाराला सहायक प्राध्यापक म्हणून मान्यताप्राप्त व पूर्ण वेळ कार्य केल्याचा आठ वर्षाचा अनुभव तसेच पीएच.डी. साठी मार्गदर्शक म्हणून कार्य केल्याचा अनुभव, याशिवाय 300 गुणांचा एपीआय असणे व तो संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरुंनी नेमलेल्या समितीकडून तपासून घेऊन तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र या संपूर्ण बाबी दुर्लक्षित करून डॉ.दौड यांना नियुक्ती देण्यात आली. त्यानुसार डॉ.दौड हे डिसेंबर 2012 मध्ये विद्यापीठात रूजू झाले होते.
डॉ.दौड यांच्या नियुक्ती संदर्भात डॉ.सुधीर भटकर यांनी तत्कालीन कुलगुरु डॉ.सुधीर उमाजी मेश्राम यांच्याकडे लेखी तक्रार करून डॉ.दौड हे सदर पदासाठी पात्र नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. परंतु डॉ.मेश्राम यांनी सदर तक्रारी संदर्भात कुठलीही दखल न घेता डॉ.दौड यांची सदर पदावर नियुक्ती केली. तत्कालीन कुलगुरु डॉ.मेश्राम यांनी डॉ.सुधीर भटकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे त्यांनी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे सन 2014 मध्ये याचिका दाखल केली. सदर याचिकेच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेल्या निर्देशानुसार मा.कुलपती तथा राज्यपालांकडे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील कलम 76 (7) नुसार अपिल केले होते. सदर अपिलाच्या अनुषंगाने मा.कुलपती तथा राज्यपाल यांच्यासमोर जुलौ 2018 मध्ये सुनावणी झाली. त्यानुसार डॉ.भटकर यांनी केलेल्या अपिलावर मा.कुलपती तथा राज्यपालांनी 16 मार्च 2019 रोजी निर्णय देत डॉ.तुकाराम दौड यांची सहयोगी प्राध्यापक पदाची नियुक्ती रद्द करून त्यांना बडतर्फ (टर्मिनेट) करण्याचे आदेश विद्यापीठाला दिले.
मा. कुलपती तथा राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार विद्यापीठाने 20 मार्च 2019 रोजी डॉ.तुकाराम दौड यांना बडतर्फीची नोटीस बजावून त्यात ते दि. 20 एप्रिल 2019 रोजी बडतर्फ होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. सदर नोटीसीच्या अनुषंगाने डॉ.दौड यांनी विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे अपिल दाखल केले होते. मात्र सदरचे अपिल न्यायाधिकरणाचे पीठासन अधिकारी न्यायमूर्ती श्री. श्रीहरी डावरे यांनी युक्तीवादानंतर निकाली काढले. यानंतर डॉ.दौड यांनी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका दाखल केली. सदर याचिकेवर न्यायमूर्ती श्री. पी.आर.बोरा यांच्यासमोर युक्तीवाद करण्यात आले. डॉ.सुधीर भटकर यांच्यातर्फे अॅङ विजयकुमार सपकाळ आणि अॅङ संकेत नितीन सुर्यवंशी यांनी तर विद्यापीठातर्फे अॅङ बोरकर यांनी युक्तीवाद केला. सदर युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री.पी.आर.बोरा यांनी डॉ.दौड यांची अंतरिम मागणी नामंजूर करून पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले. डॉ.दौड यांच्या याचिकेतील अंतरिम मागणी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने नामंजूर केल्यामुळे डॉ.दौड हे दि.20 एप्रिल 2019 रोजी बडतर्फ (टर्मिनेट) झाले. त्यामुळे विद्यापीठाने कार्यालयीन आदेशाने परिनियम 413 (अ) नुसार जनसंवाद आणि पत्रकारिता विभागप्रमुख पदी डॉ.सुधीर भटकर यांची नियुक्ती केली आहे.