सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. कारण, दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज नितेश राणे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून आजच सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे. या अर्जावर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
नितेश राणेंना कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणे आणि राकेश परब यांच्यासाठी आम्ही युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची त्यांची मागणी फेटाळली. नितेश राणेंना आता न्यायालयीन कोठडीत घेण्यात आलं आहे. आता पुढील कारवाई होईल. आता लगेच सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल केला जाईल. आज लगेच त्यावर सुनावणी होणार नाही. पण पुढील तारीख मिळेल त्यावेळी नितेश राणे यांना जामीन मिळेल, अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिलीय.