मुख्यमंत्र्यांचे मतदारांसाठी लिहिलेले पत्र कार्यकर्त्यांद्वारे घराघरांत पोहोचवणार, मुख्यमंत्रीही जाणार मतदारांच्या घरी
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन भारत कल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी आणि महाराष्ट्राला येत्या पाच वर्षांत एका निश्चित स्थानावर पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प’ हे अभियान हाती घेतले आहे. हे संकल्पपत्र आणि मुख्यमंत्र्यांचे मतदारांसाठी लिहिलेले पत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घराघरांत पाठवले जाईल. तसेच जनतेचा आशीर्वाद घेतला जाईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘या अभियानात भाजप संघटनेचा कर्ताधर्ता आमचा कार्यकर्ता बूथप्रमुख, पेजप्रमुख घरोघर हे संकल्प पोहोचवणार आहेत. या अभियानाने सर्व मतदारांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवरात्रीच्या निमित्ताने या अभियानाला सुरुवात होणार असून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्रीही काही घरी जाणार आहेत,’ असेही पाटील यांनी सांगितले.
हे आहेत संकल्प : रोजगार देणारे युवा तयार करणार, नागरी समस्यांसाठी एक हेल्पलाईन नंबर देणार
1 दुष्काळमुक्ती: दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार व वॉटरग्रीडच्या निर्मितीची प्रक्रिया आणखी गतिमान करणार.
2 सर्वांना सर्व अधिकार : 2024 पर्यंत प्रत्येक घराला पाणी, दर्जेदार शिक्षण, स्वतःचे पक्के घर आणि नवीन डिजिटल उपाययोजनांमधून सर्व सेवा घरपोच.
3 शेवटच्या व्यक्तीचा विकास : आदिवासी बांधव. छोटे पाडे, दिव्यांग, अनाथ अशा प्रत्येक घटकाचा विचार करून अंत्योदयचा विचार पूर्णतः साध्य करण्याच्या प्रयत्नांना गती.
4 सशक्त महिला : महिला बचत गट, स्वयंरोजगार चळवळ आणखी गतीने पुढे नेणार.
5 युवकांना स्थायी रोजगार : कौशल्य प्रशिक्षण, मुद्रा व विविध समाज महामंडळांतून होणारी आर्थिक मदत यातून रोजगार देणारे युवा तयार करणार.
6 बळीराजाची समृद्धी : शेतीतील गुंतवणूक, पाण्याची सोय, शेती पंपाला वीज, तंत्रज्ञानाची मदत, बाजार सुधारणा यातून राज्यात संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्धार.
7 प्राथमिक आरोग्य : म. फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणखी भक्कम आणि मजबूत करणार. राज्याच्या दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य यंत्रणा सक्षम करणार
8 महाराष्ट्राचे वैभव : शिवछत्रपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण करण्याबरोबरच गडकिल्ले, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे यांचा विकास करणार
9 पारदर्शी कारभार : सेवा हमी कायदा आणि ई-गव्हर्नन्सला महत्त्व देणार. नागरी समस्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर.