जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 17 पैकी चार जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर धक्कादायक आरोप केलाय. ‘बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून स्थानिक प्रमुख कार्यकर्ते बाजूला रहावेत, म्हणून खोटेनाटे आरोप करून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप आ.पाटील यांनी केला आहे. तसेच या साऱ्या प्रकरणासंदर्भात आपण राज्य शासनाकडे बाजू मांडली आहे. तसेच पोलीस प्रशासनाला पुरावे दिले आहेत. या सार्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
एकनाथ खडसे यांना लक्ष्य करताना आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही सत्तेत आहात म्हणून अशा प्रकारे द्वेषाचे राजकारण करणं चुकीचं आहे. ज्यावेळी सारा प्रकार घडला तेव्हा; ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते शिवसेनेचे पदाधिकारी कुठे होते? याचे पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. त्याचा तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजप सोबत युती केल्याच्या चर्चेचे खंडन केले. दोन दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली. ही भेट आकस्मिक होती. त्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. आज होणाऱ्या चार जागांच्या निवडणुकीत दोन जागांवर शिवसेना आणि भाजप आमने-सामने लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीच्या 17 पैकी 17 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील आणि नगराध्यक्ष शिवसेनेचाच विराजमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.