जळगाव । कोरोना व्हायरसने त्रस्त असलेल्या देशातील सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले. गेल्या काही महिन्यांतील महागाईचा दर डिसेंबरमध्येही कायम होता. डिसेंबरमधील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमधील 4.91 टक्क्यांवरून 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.
बुधवारी जाहीर झालेली आकडेवारी
सरकारने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 4.05 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी आधीच्या महिन्यात 1.87 टक्क्यांवर होती.
महागाई उच्च राहण्याची अपेक्षा आहे
रिझव्र्ह बँक द्वैमासिक चलनविषयक आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा डेटा पाहते. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे चलनवाढीचा आकडा आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत उच्च राहील, असा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असेल. तेव्हापासून ते खाली येईल. खाद्यतेल, महागड्या भाज्या आणि महागडे पेट्रोल, डिझेल, वीज यामुळे किरकोळ महागाईत वाढ होताना दिसत आहे.