जळगाव, (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात १७९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे. गेल्या तीन दिवसापेक्षा आज जास्तीचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.
आज जळगाव जिल्ह्यात एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण (Corona Positive) आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना महाराचीचं सावट गडद झाले असतांना जळगाव जिल्ह्यात देखील दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.दिवसागणिक वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे राज्यात निर्बंध लावण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.
आजच्या बाधितांचा आकडा १७९ वर पोहचला असून भुसावळ, चाळीसगाव तालुक्यासह जळगाव शहराची अधिक चिंता वाढली आहे. आजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरात ६४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ७३, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा २, धरणगाव १, जामनेर ५, रावेर २, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर २, बोदवड ५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात ४७३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. आज दिवसभरात १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.