जळगाव, (प्रतिनिधी)- ‘नाथाभाऊंना ठाण्याला पाठवावे लागेल’ असे वक्तव्य करत शनिवारी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी जोरदार टिकाश्र केले होते. या टिकेला प्रतिउत्तर देतांना माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी खळबळजनक वक्तव्य करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथराव खडसे म्हणाले की,मला तर ठाण्याची गरज नाही परंतु गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यातील राजीकीय वैर दिवसेंदिवस वाढतंच आहे.दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नसल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असता आ.गिरीश महाजन यांनी, ‘ईडीच्या तारखा पाहून खडसेंना कोरोना होतो’ अशी टीका केली होती. शनिवारी आ.गिरीश महाजन यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर खडेसे यांनी त्यावर प्रतिक्रिया देते वेळी म्हटले होते की,मला तर खरोखर कोरोना झाला होता परंतु सध्या मोक्का कायद्याची चौकशी होणार असल्याचे समजते. त्यामुळेच गिरीश महाजन यांना कोरोना झाला असावा असा मला संशय असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले होते.
खडसेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आ. महाजन यांनी त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘नाथाभाऊंना ठाण्याच्या उपचाराची गरज आहे. राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे खुले आव्हान आ.महाजन यांनी दिले होते. महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत खडसेंनी जहरी टीका केली असून ‘नाथाभाऊला ठाण्याला पाठविण्याची गरज नसून गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावे लागेल’ असे ते म्हणाले.