कटरा : जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गर्दी झाली होती. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तरुण भाविकांच्या दोन समूहात वाद झाला. हा वाद चिघळून हाणामारी सुरू झाली. त्यामुळं घाबरून पळापळ सुरू झाली आणि हा अपघात घडला, अशी माहिती स्थानिक खासदार जुगल किशोर यांनी दिली आहे.
वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख रुपये व जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.