जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या १२ पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हे आदेश काढले.
कोरोनामुळे पालिका निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पडणे शक्य नसल्याने, मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्त केले आहेत. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील कलम ३१७(३) मधील तरतुदीनुसार उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. पालिका, नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
नगरपरिषदा, नेमलेले प्रशासक… भुसावळ-प्रांताधिकारी, अमळनेर-प्रांताधिकारी, चाळीसगाव-मुख्याधिकारी, चोपडा-प्रांताधिकारी, पाचोरा-प्रांताधिकारी, धरणगाव-मुख्याधिकारी, एरंडोल-मुख्याधिकारी, फैजपूर- प्रांताधिकारी, पारोळा- मुख्याधिकारी, रावेर- प्रांताधिकारी, सावदा- प्रांताधिकारी, यावल-प्रांताधिकारी. नियुक्ती केली आहे. पालिका, नगरपंचायतींची मुदत संपताच तेथे संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
निवडणुका लांबण्याची कारणे
पालिकांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत आज दि.२९ रोजी संपत असून, अद्यापही निवडणुकीबाबत कुठल्याच हालचाली निवडणूक आयोगाकडून सुरु नसल्याने, पालिका निवडणुका किमान दोन ते तीन महिने लांबणीवर पडेल, असा अंदाज आहे. नुकताच पालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून, तो राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. तर प्रभाग आरक्षण काढण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातच अलिकडे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने, सोमवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने ओबीसी आरक्षण निश्चीत झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीतील इच्छुकांचा हिरमोड
पालिकांची मुदत संपत आल्याने नगरसेवक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. मात्र पालिका निवडणुका आता लांबणीवर पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आता निवडणुकीसाठी इच्छुकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवड कधी जाहीर होते, याकडे लक्ष आहे.