कासोदा ता.एरंडोल,(राहुल शिंपी )- येथील संत रोहिदास नगर भागातील अंगणवाडी क्रमांक 208 ला लागून कैलास बालकिसन अग्रवाल यांनी अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण काढून टाकण्या बाबत कासोदा ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकास नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून पाच – सहा महिने उलटून गेल्यावर देखील सदर अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याने ग्रामपंचायत नुसत्या नोटीस बजावण्यावर समाधान व्यक्त करेल की अतिक्रमण काढेल असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
सविस्तर असे की, बालकिसान अग्रवाल यांनी ग्रामपंचायतचा प्रशासकीय कार्यकाळ सुरू असताना ग्रामपंचायत जागेवर बांधकाम केलेले होते. त्यावेळेस ग्राम विकास अधिकारी जे होते तेच के.डी मोरे आज रोजी ग्राम विकास अधिकारी म्हणून कासोदा येथे कार्यरत आहेत. सदर अतिक्रमण धारकाने अतिक्रमण केले म्हणून एकाने ग्रामपंचायत कार्यालयात जुलैमध्ये तक्रार अर्ज केला होता त्या अनुषंगाने सरपंच, ग्राम विकास अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकास अंगणवाडी चे अतिक्रमण काढणे बाबत 27 जुलै रोजी नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्याचे सांगितले होते.
दिलेल्या नोटीस मध्ये नमूद करण्यात आले होते की, आपण संत रोहिदास नगर भागातील अंगणवाडी लगत गावठाण जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचे आमच्या निदर्शनास आले असून ते भविष्यात बालकांना त्रासदायक असून आपण ग्रामपंचायतीकडे कोणताही अर्ज अथवा पूर्वपरवानगी न घेता सदरचे बेकायदेशीर कृत्य केलेले असून सदर गावठाण जागेतील आपण केलेले अतिक्रमण काढून टाकून तसा अहवाल ग्रामपंचायतीकडे सादर करावा अन्यथा आपल्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल व पुढील होणाऱ्या सर्व खर्च व परिणामास आपण व्यक्तिशः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी अशी नोटीस मध्ये नोंद आहे.
परंतु सदर अतिक्रमण धारकांनी अध्याप अतिक्रमण काढलेले नाही याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आता अंतिम नोटीस देऊन सदर अतिक्रमण काढण्यात येईल म्हणजेच नोटीस पे नोटीस असा प्रकार ग्रामपंचायत मध्ये चाललेला दिसतो.
अंगणवाडीच्या शासकीय भिंतीचा ही वापर…
सदरअंगणवाडीच्या शासकीय भिंतीला खेटून अतिक्रमण केल्याची नोटीस जुलै महिन्यात देण्यात आली आहे.लहान मुलांसाठी शुद्ध हवा खेळती हवा येण्यासाठी अंगणवाडी बांधकाम करताना सदर अंगणवाडीस खिडक्या ठेवण्यात आल्या होत्या परंतु संबंधित अतिक्रमण धारकाने सदर खिडक्या बंद करून अंगणवाडीत येणारी शुद्ध हवा,मोकळी हवा ,वारा, सूर्यप्रकाश इत्यादी नैसर्गिक वायू लहान बालकांसाठी पोषक असतात . म्हणून सदर खिडक्या ठेवण्यात आल्या होत्या.परंतु सदर अतिक्रमण धारकाने लहान बालकांचा हि विचार केला नाही खिडक्या बंद करून कोंदट वातावरण तयार होऊ शकते बालकांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो या कारणाने संबंधित तक्रारदार यांनी तक्रार केल्याचे समजते.
संबंधित अतिक्रमण धारक एवढे करून सुद्धा थांबला नाही तर त्याने अंगणवाडी वाडीच्या शासकीय भिंतीच्या सुद्धा स्वतःचे पैसे वाचविण्याच्या उद्देशाने अंगणवाडीच्या भिंतीच्या सामायिक वापर करून घेतला आहे. यामुळे शासनाची फसवणूक उघड दिसत आहे.परंतु सदर बाबतीत ग्राम विकास अधिकारी यांनी बांधकाम सुरू असताना लक्ष दिले असते तर त्यांना अतिक्रमण काढण्याची आज ही वेळ आली नसती . ग्राम विकास अधिकारी फक्त नोटीस देऊन वेळ मारून नेण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे तरी आता ते अंतिम नोटीस कधी देतात याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.