नाशिकः आयकर विभागाच्या सुमारे दीडशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये 32 ठिकाणी जमीन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, कंत्राटादारांशी संबंधित बिल्डर्स यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. या टाकलेल्या छाप्यात अक्षरशः सामान्य व्यक्ती चक्रावून जाईल इतके म्हणजे तब्बल 240 कोटींचे घबाड सापडले आहे. 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने यावेळी जप्त करण्यात आले. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
बुधवारी, 22 डिसेंबर रोजी पहाटे सुरू झालेली ही कारवाई सुमारे पाच दिवस चालल्याचे समजते. मात्र, याची कुणकुणही कोणाला लागू देण्यात आली नाही. या कारवाईत एकूण 240 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. एकाचवेळी नंदुबारसह इतर ठिकाणच्या बिल्डरची कार्यालये, घरे, भागीदारांचे निवासस्थान, नातेवाईक यांच्या घरी हे छापे टाकण्यात आले.
नाशिकमध्ये शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनीत आयकर विभागाने छापे टाकले. या कॉलनीतील व्यावसायिकांची घरे आणि त्यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. विशेषतः देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही कित्येकांचे घबाड सापडल्याचे समजते
12 तास मोजदाद
आयकर विभागाच्या पथकाला यावेळी अनेक धक्कादायक बाबी समजल्या. अनेक व्यावसायिकांनी तब्बल 25 कोटींचे व्यवहार रोखीत केल्याचे समोर आले. यावेळी तब्बल 6 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या अफाट मायेची मोजदाद करायला पथकाला जवळपास 12 तास लागले. पैसे मोजता मोजता मशीन थकल्या आणि दागिने मोजता मोजता हात दुखू लागले, अशी अवस्था यावेळी होती. अजय देवणगणचा रेड सिनेमा अनेकांना आठवत असेल. अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी होती.
मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे
आयकर विभागाला यावेळी पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात अतिशय मौल्यवान हिरे, सोन्याची बिस्कीटे, मोत्याची दागिने अशी मोठी जडजवाहिरे सापडली. अनेकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. कित्येकांचा नातेवाईकांच्या घरी पैसा होता. तर कित्येकांनी दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्याचेही समोर आले आहे. या कारवाईने उत्तर महाराष्ट्रातील अफाट माया कमावणाऱ्या बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.