मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. राज्यात व्यापाऱ्यांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. त्याचवेळी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने गुरुवारी कन्नौजचे मोठे परफ्यूम आणि पान मसाला व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. आतापर्यंत जवळपास १५० कोटींची बेनामी मालमत्ता आढळल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबई, कन्नौज आणि कानपूरमध्ये ‘समाजवादी परफ्यूम’ लॉन्च करण्यात मोलाचा वाटा असलेले कन्नौज व्यापारी पियूष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले. तिन्ही ठिकाणी एकाच वेळी सुरू झालेली ही कारवाई दोन-तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. पियुष जैन हे मोठे उद्योगपती असून ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत.
परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरी प्राप्तिकर विभागाचा तपास सुरू आहे. प्राप्तिकर विभागाची टीम घरात कागदपत्रे आणि प्राप्तिकर तपशील गोळा करत आहेत. पियूषच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच घराच्या रक्षकांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले असून, व्यावसायिकाकडे सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी विभागाला चार मशीन मागवाव्या लागल्या.