मुंबई : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. यामुळे लिखाणाचा सराव सुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहावी व बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ७० आणि त्याहून अधिक गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे आणि ७०हून कमी गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन शिक्षणामुळे गतवर्षीही हा बदल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी ऑफलाइन परीक्षाच झाली नाही.
यंदा बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक https://www.mahasscboard.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे.
वेबसाइटवर देण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. दहावी, बारावी परीक्षेच्या आधी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक हे अंतिम स्वरुपाचे असणार आहे. छापील वेळापत्रकावरुन विद्यार्थ्यांनी तारखांची खात्री करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.