मुंबई : भारत कोरोना विषाणू लढा देत असतानाच आता नवे ओमायक्रॉनचे संकट चालून आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र कधी कधी सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींना या नियमांचा विसर पडतो. नुकतेच चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मास्क न घातल्याने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आमदारांवर कारवाई करणाऱ्या कर्तव्य दक्ष पोलिसांचे सोशल मिडियावर कौतुक होत आहे.
आमदार मंगेश चव्हाण हे मंगळवारी मंत्रालयात गेले होते. तेथून बाहेर पडत असताना त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना २०० रुपयांचा दंड केला. आमदारांवरही कारवाईसाठी पुढे आलेल्या पोलिसांचे मंत्रालयात कौतुक केले जात अाहे. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता दंड भरला. दरम्यान, मुंबईत पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
कायदा सर्वांसाठी सारखा
‘कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मी कायदा मोडल्याने कारवाई झाली. त्यात काही गैर नाही. मी माझ्या मतदारसंघात गरिबांना लुटणाऱ्यांचे स्टिंग केले होते. या सरकारने त्यात लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.