जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या दीड वर्ष बंद असलेली चाळीसगाव ते धुळे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून या मेमू रेल्वेगाडीला आठ डबे असणार आहेत. आठवड्याचे सोमवार ते शनिवार नियमित ही सेवा सुरू राहणार आहे.मेमू रेल्वेचे वेळापत्रक जाणून घेऊया.
ENHANCING COMFORT.
Chalisgaon – Dhule Memu Services flagged-off by Hon'ble MoSR Shri @raosahebdanve
6 Days a Week – Every Monday to Friday. Stopping at all stations.@RailMinIndia pic.twitter.com/AE6lbUIrgz— Central Railway (@Central_Railway) December 13, 2021
चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.याशिवाय खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळेचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस. एस. केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी श्री. गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासन प्रवाशांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन रेल्वे सेवा, मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करण्यात येत आहेत. महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले, मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा महत्वाकांक्षी सोलापूर- जळगाव रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. रेल्वे सेवा व अन्य मार्गांसाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान चाळीसगाव-धुळे मेमू रेल्वे दीर्घकालावधीनंतर सुरू झाली. यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते. या नवीन गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगावसह धुळेकरांनी गर्दी केली होती. मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर राज्यमंत्री श्री. सत्तार यांच्यासह रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चाळीसगावपासून भोरस रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास केला.
00000