जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नातही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मिश्किल जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
महाजन म्हणाले, वरपिता गुलाबराव पाटील आमचे जुने मित्र आहेत. त्यांनी आणि आम्ही तब्बल २५ वर्षे संसार केला पण जयवंतराव तुम्ही तो मोडलात. पण आता संसार मोडला असला आमचे शिवसेनेवर आजही प्रेम कायम आहे. महाजन यांच्या या जाहीर कबुलीनंतर उपस्थित जयंत पाटील यांच्यासह सर्वच मंडळीत हास्याचे फवारे उडाले.
गिरीश महाजन यांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त प्राधान्य देण्याची गरज नसल्याचे सांगितले.