मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात 8 ते 12 वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागांत तर शिक्षक, शाळाचालक, पालक अशी सर्वच मंडळी त्यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर आता राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबतही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभागाचाही शाळा सुरू कऱण्याच्या संदर्भात प्रस्ताव आहे. आरोग्य विभागाने तर परवानगी दिली आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, निश्चितपणे मुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय होईल. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा सुद्दा मुद्दा मांडण्यात आला आहे.
50 टक्के पर्यंतच्या परवानग्या नाट्यगृह आणि सिनेमागृहांना दिल्या आहेत. परिस्थिती सुधारत आहे आणि अशीच सुधारत राहिली तर भविष्यात निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री स्तरावर यावर निर्णय घेण्यात येईल असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.