येत्या जानेवारी २०२२ आधीच काही वस्तू महाग होणार असल्याची बातमी समोर आल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे.केंद्र सरकारनं २०२२ पासून गारमेंट्स, कपडे आणि चप्पल यासारख्या गोष्टींच्या उत्पादनावरील जीएसटी ५ टक्क्यांहून १२ टक्के करण्याचा म्हणजे दुप्पट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे,यामुळे नवीन वर्षात सामान्यांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे.
गारमेंट्स, कपडे आणि चप्पल यासारख्या गोष्टींच्या उत्पादनावरील जीएसटी ५ टक्क्यांहून १२ टक्के वाढविण्याबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने याची नुकतीच घोषणा केली आहे.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२२ पासून जीएसटी ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के लागू होणार आहे. जो आधी १ हजार रुपयांच्या किंमतीपर्यंत ५ टक्के होता.
या वस्तू होतील महाग….
नवीन वर्ष २०२२ मध्ये टेक्सटाइल्स (विणलेले कपडे, सिथेंटिक यार्न, पाइल कपडे, कंबल, टेंट, टेपेस्ट्री सारखे सामानासह चप्पल सर्व फुटवेअर या वस्तू महागणार आहेत.तर कोणत्याही किंमतीच्या फुटवेअरवर सुद्धा नवे जीएसटी दर लागू केले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार जीएसटी काउंसिलने ती वाढवण्याची शिफारस केली आहे.
दरम्यान क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CMAI) यांनी कपड्यांवरील जीएसटी दर वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते खरंतर या खर्चात वाढ झाल्याने कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.आधीच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि मालवाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे हा उद्योग अडचणीत सापडला आहे.
एसोचॅमने अन्न प्रक्रिया उद्योगाला लागू होणारे जीएसटीचे दर कमी करण्याची मागणी केली असून या विभागात पॅकेज केलेल्या ब्रँडेड आणि नॉन-ब्रँडेड खाद्यपदार्थांमध्ये लागू होणारे दर तर्कसंगत असे देखील सुचविण्यात आले आहे.सध्या, बटाटा चिप्स, तृणधान्ये, स्नॅक फूड्स, नमकीन यासारखे ब्रँडेड आणि पॅकेज केलेले खाद्यपदार्थ १२ टक्के स्लॅबमध्ये येतात, तर नॉन-ब्रँडेड नमकीन, चिप्स आणि भुजिया यांच्यावर पाच टक्के कर आकारला जातो.