सुपरस्टार सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटावरून दिवसेंदिवंसं वाद वाढत असताना तामिळनाडू पोलिसांनी पट्टाली मक्कल कौची (पीएमके) या राजकीय पक्षाच्या नेत्या विरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.तर अभिनेता सूर्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
पीएमके नेत्याने तामिळ स्टार सूर्यावर हल्ला करण्यासाठी एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. ‘जय भीम’ चित्रपटातील वन्नियार समाजाच्या व्यक्तिरेखेवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही दाद दिली.
वादानंतर देखील चित्रपट निर्माते आणि अभिनेता सूर्या यांना इंडस्ट्री आणि चाहत्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. दुसरीकडे हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी सूर्या आणि त्याच्या घराभोवती सुरक्षा वाढवली आहे. मायलादुथुराई पोलिसांनी बुधवारी पीएमके नेत्याविरुद्ध सूर्याला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीएमकेचे जिल्हा सचिव सीतामल्ली पलानीसामी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या पाच कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.
विशेष म्हणजे त्यांच्यावर अजामीनपात्र कलमही आहे. म्हणजेच अशा परिस्थितीत ए पलानीस्वामी यांना अटक झाली तर त्यांना जामीन मिळणेही कठीण होणार आहे. सूर्याच्या घराची सुरक्षा वाढवली, या सगळ्यात चेन्नईतील सूर्याच्या घरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा आहे.